www.upkarmarathi.com

संतांची शिकवण मराठी निबंध | Santanchi shikvan essay in Marathi language


 | संतांची शिकवण मराठी निबंध
 | santanchi shikvan Marathi nibandh

      प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण " संतांची शिकवण मराठी निबंध "   | Santanchi shikvan Marathi nibandh  यावर आधारित लेखन  करणार आहोत. आत्ताच्या धकाधकीच्या काळामध्ये पुस्तक वाचायला किंवा ग्रंथ वाचायला कोणाकडेच वेळ नाही . परंतु तुमच्या या वयामध्ये तुम्ही जर वाचनाकडे लक्ष दिले आणि थोडासा वेळ दिला,  तर वाचनातील ताकद आणि त्याची आवड या दोन्ही गोष्टींचा फायदा तुम्हाला समजून येईल.
           संतांना शास्त्रज्ञ म्हटले तर अजिबात चुकीचे ठरणार नाही. अनेक वर्षांपूर्वी संतांनी ज्या पद्धतीने भाकीत करून ठेवलेले आहे,  भविष्याविषयी त्यांनी जे वर्णन सांगितले आहे , सध्याच्या प्रगत काळामध्ये तसेच घडत आहे. यावरून त्यांच्या अंगी असलेला दूरदृष्टीकोन लक्षात येतो.


  " संतांची शिकवण  "यावर आधारित निबंध लिहिताना खालीलप्रमाणे मुद्दे आपल्याला लक्षात घेता येतील

  1. संतांनी केलेला उपदेश
  2. संतांचे वागणे
  3. समाजापुढे आदर्श निर्माण करणे
  4. लोकांना संस्कारक्षम बनवणे , उपदेश, प्रबोधन
  5. सर्व धर्म समभाव
  6. जातीयतेचे निर्मूलन
  7. लोकहितकारी साहित्याची निर्मिती
  8. संस्कारांचा अनमोल ठेवा
  9.  निष्कर्ष
चला तर मित्रांनो वरील सर्व मुद्द्यांच्या आधारे आपण "संतांची शिकवण मराठी निबंध "  बघूया

संतांची शिकवण मराठी निबंध

 | Santanchi shikvan essay in Marathi language


  " या संतांसी  भेटता
 हरे संसाराची व्यथा
 पुढता पुढती माथा 
अखंडित ठेवीन "

                        या अभंगांमधून माऊली ज्ञानोबा संतांचे महत्त्व वर्णन करतात . ज्ञानोबा म्हणतात की , संतांना भेटल्यावर संसाराच्या सगळ्या व्यथा दूर होतात आणि परम आनंद प्राप्त होतो. असे  संत मला भेटले  तर मी सतत त्यांच्या चरणावर माझे मस्तक ठेवीन आणि त्यांचे आशीर्वाद घेईन.
      मानवता व संस्कृतीशी एकरूप झालेल्या संतांनी माणसात देव शोधण्याची निर्मळ दृष्टी दिली. जीवनाचा मार्ग तत्वाने जगण्याचा मूलमंत्र संतांनी दिला.
                   माऊली ज्ञानोबाराय संतांना एवढे महत्व का देतात ? याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संत फक्त इतरांना उपदेश करत नाही .ते स्वतः च्या वागण्याने समाजापुढे एक आदर्श उभा करतात. म्हणजे सध्याच्या काळात जसे घडते कि, " लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण " असे संतांच्या बाबतीत कधीही होत नाही.  ते आधी स्वतः तसे वागतात आणि मग त्यावर आधारितच उपदेश करतात. म्हणूनच तर असे म्हणतात ना , " बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले "
         संत मंडळींनी सर्व बहुजन समाजाला ईश्वरप्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजेच भक्ती मार्ग दाखवला. दैनंदिन जीवन जगत असताना देखील आपण परमार्थ कसा साधू शकतो भवसागर तरुन जाऊन परमेश्वराची प्राप्ती कशी करायची परमार्थाचे पैलतीर कसे काढायचे याची शिकवण संतांनी दिली. तेही अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये.
      संत हे केवळ संत नसून त्यांनी तत्कालीन समाजाचा सखोल अभ्यास केलेला होता माणसामाणसांमधील  असमता , असंतोष , जातिभेद इत्यादी गोष्टींचा त्यांनी  अभ्यास केला व लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. या अर्थांने संतांना खरेच समाज सुधारक असेच म्हणावे लागेल.
         संत हे दिसायला सामान्य माणसांप्रमाणेच असतात परंतु त्यांचे व्यक्तिमत्व हे सामान्य नसते. संत हे असामान्य व्यक्तिमत्त्वाचे धनी असतात.
           संतांनी प्रेम, करुणा, समता,  समानता, बंधुता , अहिंसा अशा गुणांची शिकवण दिली. संतांची शिकवण म्हणजे फक्त हवेचे बुडबुडे नव्हेत तर उत्तम आचरणाचे देखील त्याला जोड आहे म्हणून आजही संतांचे विचार आणि संतांची शिकवण माणसाला मार्गदर्शन करत आहे.
       संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांना माऊली या नावाने संबोधले जाते असे संत ज्ञानेश्वर यांनी पसायदान मधून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठीच प्रार्थना केलेली आहे.
        प्राणीमात्रांवर दया करा, भूतदया बाळगा. असे संत एकनाथ आपल्या आचरणातून दाखवून देतात. संत एकनाथ हिशोब करत असताना त्यात एका पैशाची गफलत होत होती . ती चूक शोधून काढण्यासाठी संत एकनाथ रात्रभर जागे होते . यावरून त्यांचा प्रामाणिकपणा दिसून येतो. त्याबरोबरच आपल्या कर्तव्याशी आपली जबाबदारी ही निश्चित दिसते.
        दैनंदिन व्यवहार जगत असताना ना आपली बाजू नेहमी सत्तेचीच असली पाहिजे व्यवहारांमध्ये आपल्याकडे कोणीही अप्रामाणिक म्हणून बोट दाखवता कामा नये. आपल्या कामातील प्रत्येक जबाबदारी आपण प्राणपणाने केली पाहिजे.
        संत तुकाराम म्हणजे संतांच्या शिकवणीचा कळस होय. प्रपंच करत करत त्यांनी परमार्थ साधला.

    " जे का रंजले गांजले 
त्यासी म्हणे जो आपुले 
तोचि साधू ओळखावा
 देव तेथेची जाणावा  "

               यासारख्या अभंगांमधून संत तुकाराम महाराज आपल्याला भूतदया शिकवतात. निसर्गाची काळजी घ्या . झाडे लावा वृक्षतोड करू नका. अशी प्रकारचे शिकवण संत तुकाराम महाराज यांनी खालील अभंगांमधून दिलेली आहे 
" वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे 
पक्षीही सुस्वरे आळविती "

               कोणतेही काम करण्यासाठी आधी आरोग्यदायक शरीर असणे अत्यंत गरजेचे आहे. शरीर धष्टपुष्ट आणि बलदंड असेल तर आपण मोठी मोठी कामे करू शकतो. आरोग्याचे महत्त्व लोकांना समजून देण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी ठिकाणी हनुमानाची मंदिरे स्थापन केली . बलोपासना म्हणजेच व्यायामाचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. व्यायाम करता यावा त्याचे महत्त्व समजावे म्हणून आज पासून सुमारे तीनशे वर्षांपूर्वी त्यांनी अनेक ठिकाणी कुस्तीचे आखाडे उभारले होते.
      संतांनी स्वतः खूप त्रास सहन केला परंतु लोकांना मोलाचे मार्गदर्शन करण्यापासून ते कधीही मागे हटले नाही. त्यांचा हा त्याग व सेवावृत्तीच संतांना पूजनीय बनवते. यामुळेच संतांच्या सहवासाला भगवंंताच्यापेक्षा ही जास्त महत्त्व दिले गेलले आहे. संत सहवासामध्ये मनाची शांतता आणि भगवंताची प्राप्ती निश्चितपणे होते.
       संतांचे महत्त्व जाणून तुकाराम महाराज ईश्वराजवळ असेच मागणे मागतात की,
 " न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा "
 यातून देखील संतांची महती अधोरेखित होते संतांचे विचार हे आजपर्यंत संपूर्ण मानव समाजाला मार्गदर्शन करत आहे आणि पुढील अनेक पिढ्यांमध्ये देखील हे विचार दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करत राहतील यामध्ये अजिबात शंका नाही.
      मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले एवढेच काय मंगळ ग्रहापर्यंत देखील मनुष्य जाऊन पोहोचलेला आहे. पण इतक्या प्रगत देखील मानसिक समाधान आणि स्वास्थ्य माणसाला मिळालेले आहे असे म्हणणे म्हणजे खूपच चुकीचे ठरेल. परंतु मनाला शांतता देण्याचे सामर्थ्य संत साहित्यामध्ये आणि त्यांच्या विचारांमध्ये आहे. कितीही प्रगती केली तरीदेखील संतांचे विचार हे मानवाला दीपस्तंभ बनुन मार्गदर्शन करत राहतील.

      प्रिय विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण आज संतांची शिकवण मराठी निबंध|santanchi shikvan essay in in Marathi language|मराठी निबंध बघितला. तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते एक सुंदर कमेंट करुन मला नक्की कळवा. धन्यवाद.
     







Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने