www.upkarmarathi.com

Maharaja sayajirao gaekwad information


महाराजा सयाजीराव गायकवाड 
उर्फ 
सयाजीराव खंडेराव गायकवाड

जन्म:     11 मार्च 1863
मृत्यू:    6 फेब्रुवारी 1939

                महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे पूर्ण नाव सयाजीराव खंडेराव गायकवाड असे होते. महाराजा सयाजीराव गायकवाड हे प्रजाहितदक्ष , पुरोगामी, ग्रंथालयांचे प्रवर्तक, ग्रंथकारांचे आश्रयदाते , विद्या अभिलाशी संस्थानिक होते.

|महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा परिचय व ग्रंथसंपदा 
 
               सयाजीराव गायकवाड हे जागतिक कीर्तीचे ज्ञानोपासक व समाजसुधारक होते. नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव तालुक्यात असलेल्या कौळाणे येथील  काशीराव गायकवाडांचे ते द्वितीय चिरंजीव होते. तेच पुढे बडोदा राज्याचे अधिपती झाले. सयाजीराव गायकवाड यांना कैलासवासी खंडेराव गायकवाड यांच्या पत्नी जमनाबाई साहेब यांनी 27 मे 1875 रोजी दत्तक घेतले होते. सयाजीरावांचे मूळ नाव गोपाळराव होते ते बदलून सयाजीराव असे नाव ठेवण्यात आले.
        सयाजीराव लहानपणापासूनच अत्यंत हुशार होते. जमनाबाई यांना कोणीतरी प्रश्न केला की , दत्तक देण्याकरता आणलेल्या मुलाला इथे का आणले ? यावेळी जमनाबाईंच्या अगोदरच सयाजीराव म्हणाले, "महाराज होण्याकरता." त्यांच्या या तडफदार पणाने जमनाबाईंचे लक्ष त्यांच्याकडे ओढून घेतले.
      सयाजीरावांच्या शिक्षणाकडे त्यांच्या मातोश्री जमनाबाई, दिवाण सर टी. माधवराव व इलियट यांनी खूप गांभीर्याने मेहनत घेऊन लक्ष दिले. वारंवार दिल्ली दरबारला जाणे, प्रिन्स ऑफ वेल्स चे स्वागत इत्यादींमुळे त्यांच्या शिष्टाचार पूर्वक वागणुकीला वळण लागत होते.
      सन 1880 मध्ये त्यांचे लग्न होऊन व्याख्यानाद्वारे शिक्षण मिळून त्यांना 1880 लाच् अधिकार पद प्राप्त झाले. ज्यावेळी त्यांना दत्तक घेऊन आणले गेले त्या वेळी ते केवळ बारा वर्षाचे होते. निरक्षर स्थितीमध्ये बडोद्याला आलेला हा गरीब मराठ्यांचा मुलगा अठराव्या वर्षी बडोदा सारख्या एका मोठ्या राज्याचा कारभार स्वतःच्या हिमतीवर जबाबदारीने चालवू लागला.

| सयाजीराव गायकवाड यांचे कार्य 

      मल्हार राव आणि खंडेराव यांच्या राजवटीमध्ये व राज्यकारभार नियमित नव्हता. तसेच त्यामध्ये सुव्यवस्था देखील नव्हती. भोंगळ कारभारामुळे राज्याची आर्थिक स्थिती चांगली नव्हती . पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमूलाग्र बदल झाला . सयाजीरावांनी राज्यकारभार हाती घेतला, तेव्हा जुनी कर्जफेड करून देखील संस्थानाच्या तिजोरीत दीड कोटी रुपये शिल्लक असलेले आढळले .
       या सर्व शिल्लक रकमेचा उपयोग सयाजीराव गायकवाड यांनी अत्यंत कल्पकतेने केला. शैक्षणिक खाते, वैद्यकीय खाते इत्यादी अनेक खात्यांची त्यांनी स्थापना केली . सर्वात महत्त्वाचे म्हणजे बडोदा कॉलेजची स्थापना केली. त्यामुळे बडोदा संस्थानात शिक्षणाचा प्रसार होण्यामध्ये मोलाची भर पडली.
         महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी राज्यकारभाराची व्यवस्था पाहण्यास ज्यावेळी सुरुवात केली तेव्हा त्यांना सर्वच बारीकसारीक गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यावे लागत असे . प्रत्येक किरकोळ गोष्टीला त्यांना स्वतः मंजुरी द्यावी लागत असे . त्यामुळे कामाचा वेळ बर्‍याचदा यातच जात असे. विनाकारण वाया जाणारा वेळ वाचवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांना सतत वाटत होते. शिवाय प्रत्येक जबाबदारी स्वतः घेतल्यामुळे अधिकाऱ्यांना देखील स्वतःच्या जबाबदारीची जाणीव होत नव्हती.
       सयाजीराव गायकवाड महाराजांनी सर्व विभागांमध्ये नियमबद्धता निर्माण केलेली प्रत्येक अधिकाऱ्याला जबाबदारीची विभागणी करून दिली .त्यामुळे अधिकाऱ्यांना स्वतःच्या कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव झाली. आपला राज्यकारभार आपल्या गैरहजेरीत देखील सुरळीत चालेल अशा पद्धतीने त्यांनी नवीन यंत्रणा तयार केली. तयार केलेल्या यंत्रणेची कार्य पद्धती तपासून बघण्यासाठी ते  स्वतः परदेशात  राहिले व आपले राज्य कसे चालते याचा अभ्यास त्यांनी केला.
         जगभर प्रवास करत असताना एखाद्या ठिकाणी त्यांना प्रगतीपथावर नेणारी एखादी गोष्ट आवडली ,तर ते लगेच आपल्या पहिल्या दर्जाच्या तज्ञांचा सल्ला घेत .  योग्य योजना आखून त्या पद्धतीने स्वतःच्या संस्थानांमध्ये अंमलबजावणी कशी करता येईल ? याची आखणी करत . योग्य  अधिकाऱ्याला योजना कार्यान्वित करण्यासाठी नियुक्त करत असत . ज्या अधिकाऱ्याला नियुक्त केले त्याच्या अधिकारांमध्ये आपण ढवळाढवळ न करणे ,हे त्यांच्या कारभाराचे प्रमुख सूत्र होते. तसेच एखादी योजना सुरू केली, की ती मध्येच अर्धवट न सोडता शेवटपर्यंत चिकाटीने पूर्ण करणे यामध्ये त्यांचा हातखंडा होता.
      आपली प्रजा सुखी राहावी आणि तिची सतत भरभराट व्हावी म्हणून राज्यावर येताच त्यांनी एक जाहीरनामा काढला. महाराजांनी आपल्या राज्याच्या प्रत्येक भागात प्रवास केला आणि सर्व राज्यकारभार व्यवस्थित चालविण्याकरिता 1883 साली अधिकाऱ्यांचे सल्लागार मंडळ नेमले. या मंडळाचे सदस्य संख्या वाढत सत्तावीस इतकी झाली . यालाच " लेजिस्लेटिव्ह कौन्सिल्स " किंवा " धारासभा " असे म्हटले जाते.
      महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या राज्यांमध्ये न्याय व अंमलबजावणी या खात्यांची विभागणी केलेली होती .अशी सुधारणा करून त्यांनी त्यांचा दूरदृष्टीपणाच दाखवला. इतकी कल्पक सुधारणा ब्रिटिश मुलुखातदेखील 1945 सालापर्यंत सुद्धा झाली नव्हती.
        संस्थानांमध्ये दिवाणी व फौजदारी असे कायदे करण्यात आले होते.1900 सालामध्ये त्यांनी ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले .ग्रामपंचायती मार्फतच गावाची सर्व व्यवस्था व्हावी असा कायदा केला. आरोग्य विभाग,  पोलीस विभाग, शिक्षण  विभाग इत्यादी बाबत त्यांनी अनेक नवनवीन योजना केल्या .आपला  हुकुम सरकारी आज्ञा पत्रिकेच्या द्वारे प्रसिद्ध करण्याची व्यवस्था त्यांनी केली. सयाजीरावांना वरिष्ठ इंग्रज सत्तेशी नेहमीच झगडावे लागले.                 महाराजांच्या गैरहजेरीत  सेटलमेंट कमिशनचे असिस्टंट वासुदेव सदाशिव बापट यांची चौकशी करून प्रेसिडेंट ने त्यांना सहा महिन्यांची शिक्षा व दहा हजार रुपये दंड केला (ऑगस्ट1894).  व  महाराज परत आल्यानंतर लगेच त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. त्यामुळे संस्थांतर्गत कारभारामध्ये ब्रिटिशांचे कितपत अधिकार असावेत किंवा त्यांचा कितपत हात असावा? असा प्रश्न निर्माण झाला. यामुळे महाराजांना पुष्कळ मानसिक त्रासाचा सामना करावा लागला .इंग्रज सरकारशी सतत झगडावे लागले. 
          1900 साली महाराज सयाजीराव गायकवाड युरोपमध्ये गेले होते. त्यावेळी व्हाईसरॉय कर्झन बडोद्यास आलेला होता. बडोद्यास महाराज नव्हते त्यामुळे त्यांनी स्वागत समारंभ करून घ्यायला नकार दिला. पुढे काही दिवसांनी लगेचच संस्थानिकांच्या वागणुकी संबंधित कर्झन सर्क्युलर बाहेर पडले . या सर्कुलर मध्ये संस्थानिकां विषयी खूपच अपमानकारक भाषा वापरण्यात आली होती. तसेच कोणत्याही भारतीय संस्थानिकांनी व्हाईसरॉयची परवानगी घेतल्याशिवाय हिंदुस्थानाच्या  बाहेर जाऊ नये. तसेच अशी परवानगी देणे किंवा नाकारणे  हा अधिकार पूर्णपणे व्हाईसरॉयच्या हातात असेल . सयाजीराव महाराज हिंदुस्थानात परत आल्यानंतर त्यांनी या सर्क्युलर बाबत तीव्र शब्दात नाराजी व्हॉइसरॉय यांना कळवली .
    1903 साली  बादशाह सातवे एडवर्ड यांच्या राज्यरोहण यानिमित्त दिल्लीमध्ये दरबार भरवण्याची आणि त्यावेळी हत्तीवरून त्यांची मिरवणूक काढण्याचे ठरवले गेले. या मिरवणुकीमध्ये सर्व संस्थानिकांनी दरबारात यावे व मिरवणुकीत भाग घ्यावा . अशा प्रकारचा एक हुकूम काढला गेला. या हुकुमा विरुद्धही महाराजांनी योग्य त्या शब्दांमध्ये नाखुषी व्यक्त केली.
       तसेच महाराजांच्या खास नोकरांचे पोशाख हे निळ्या रंगाचे होत. निळा रंग हा सार्वभौमत्वाचे निदर्शक आहे असे मानले जात असे . त्यामुळे व्हाईसरॉयला भारतीय संस्थानिकांच्या नोकरांचे हे पोशाख आपल्या बरोबरीचे निदर्शक आहे असे वाटलेे . व त्यांनी या पोषाखाच्या  वापरण्यावर संस्थानिकांना बंदी घातली ,परंतु महाराजांनी या आदेशाला जुमानले नाही.

  | महाराज सयाजीराव गायकवाड यांचे शैक्षणिक कार्य 

                    महाराज आपल्या प्रजेचे मध्ये खूपच लोकप्रिय होते परंतु याचा उलट परिणाम असा झाला की इंग्रज सरकारचे  ते अप्रिय होते. यामुळेच महाराजांना सतत मानसिक त्रास भोगावा लागला. महाराज ज्या वेळी गादीवर आले तेव्हा त्यांच्या राज्यांमध्ये 180 प्राथमिक शाळा होत्या . पुढे त्यांनी 1893 साली अमरेली प्रांतांमध्ये प्रयोग म्हणून सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना अमलात आणली.
         1906 साली सर्व राज्यामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले व सार्वत्रिक करण्यात आले. शिक्षणाचा हा कारभार व्यवस्थित चालवण्यासाठी त्यांनी 2539 शाळा चालवल्या.
      प्राथमिक शिक्षणाबरोबरच दुय्यम आणि उच्च शिक्षणाची देखील व्यवस्था करण्यात आली.  त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या निर्माण केल्या . त्यामुळे वेगवेगळ्या विषयांमध्ये अभ्यास करण्याला उत्तेजन मिळाले आणि त्यामुळे औद्योगिक शिक्षणाकरिता कलाभूवन  यासारख्या संस्थाही निर्माण करण्यात आल्या.
     स्त्री शिक्षणा करीता उच्च व औद्योगिक शिक्षणाची योजना आखून त्याकरिता त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या ठेवल्या. मुंबई इलाख्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांकरिता एक लक्ष रुपयांची देणगी महाराणी साहेबांनी दिली.
     वाचनालय याबाबतही त्यांच्या संस्थानातील प्रगती अपूर्व होती शाळा प्रमाणे वाचनालय प्रत्येक गावे निर्माण करण्याकरिता त्यांनी स्वतंत्र वाचनालय खाते उघडून त्या मार्फत वाचनालय काढण्याची व्यवस्था केली. अमेरिकेतल्या फिरत्या वाचनालयाची व्यवस्थाही त्यांनी आपल्या वाचनालयात केली.
    त्यांच्या मध्यवर्ती वाचनालयात लाखाच्यावर पुस्तके आहेत. अनेक विभाग पाडून त्याची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय संस्कृत मराठी गुजराती हिंदी व इंग्रजी इत्यादी भाषांमधून 300 पेक्षा जास्त ग्रंथ त्यांनी छापून प्रसिद्ध केले व अनेक ग्रंथांना उत्तेजनार्थ मदत केली.
   


Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने