1001marathiessay.blogspot.com



उपकार...वाचनीय मराठी कथा {upkar.. vachaniy marathi story}



     "अगं ,शेरू ला उठव .कामाला उशीर झालाय." असं म्हणून जगनने आपल्या बायकोला म्हणजे शेवंताला सांगितलं .शेवंता जगुला म्हणाली ,"अहो ,शेरू झोपला आहे अजून आणि जीवापण झोपला आहे. काल खूप दमली दोघं म्हणून आज मी उठवलं नाही त्यांना ."अगं थकून, सांगतोय कुणाला ,,,आपण  फक्त काम करायचं . थकलो आहे अशी कारण द्यायची आपल्याला परवानगी नाही.
" चल आता वेळ लावू नकोस उठव त्यांना..". 
 शेवंता ने नाईलाजानेच का होईना दोघांना उठवले .
 शेरू  पटकन उठला पण,,  जीवा काही उठायचं नाव घेईना.
      शेरू उठला आणि चुलीजवळ असलेल्या टोपलीवर जाऊन बसला. शेरू म्हणजे जगुला सापडलेलं माकडाच छोटसे पिल्लू .
       जग्गू आणि शेवंता हे डोंबारी कुटुंब .मजल दर मजल करत प्रवास करायचा .रस्त्याच्या काठाने खेळ दाखवायचे दोरीवरच्या कसरती करायच्या  आणि मिळेल त्या पैशातून  संसार चालवायचा हा त्यांचा नित्यक्रम.
       असाच एका डोंगरदऱ्यातील खेड्यांमध्ये खेळ करून झाल्यानंतर मुक्कामासाठी एका शेताच्या मोकळ्या बाजूला त्यांनी आपला तंबू लावला. आजूबाजूला डोंगर पसरलेले होते. झाडेही घनदाट होते .अशावेळी अचानक झाडांचा जोरात आवाज  होऊ लागला. 
     हातात भाला घेऊन अंदाज घेण्यासाठी जग्गू पुढे निघाला. एका झाडाच्या जवळ आल्यानंतर अचानक काही माकड झाडावरून खाली पडले. त्यातील तीन चार माकडे एका माकडाला मारत होती .मार खाणाऱ्या माकडाजवळ  छोटे पिल्लू होते आणि त्या पिल्लाचा जीव वाचवण्यासाठी हे माकड धडपडत  होते. त्या तीन-चार माकडांनी मिळून मोठ्या माकडाला ठार केले .त्याच्या निर्जीव हातातून माकडाचे पिल्लू सुटून पळू लागले .त्याला मारण्यासाठी  ती माकडे पुढे धावून आलेत परंतु  माकडाचे पिल्लू जगूच्या मागे लपून बसले. जगुने त्या माकडांना पळवून लावले व तो झोपडीकडे निघाला . माकडाचे पिल्लू जगूच्या मागे चालत येऊ लागले.अखेर त्या पिलाला घेऊन जगू झोपडीत आला .  जीवालाही माकडाचे पिल्लू बघून खूपच आनंद झाला. तेव्हापासून शेरू जग्गूच्या कुटुंबाचाच एक भाग बनून गेला.
      शेरू मुळे जग्गू च्या खेळालाही बहार आला. शेरूमुळे जगुला अधिक पैसे मिळू लागले. शेरू म्हणजे जगू साठी माकडाचे केवळ एक पिल्लू नसून पोटच्या पोरासारखा झाला होता. जीवा सारखेच शेरूचिही  तो अगदी काळजी घेत असे . शेरु आल्यापासून आठ दिवसाच्या आतच जगूने शेवंता साठी एक छान साडी घेतली. शेवंताला जणू ती साडी जगु ने नव्हे तर शेरूनच घेऊन दिली आहे असे वाटायचे. पण ते मुके जनावर भावनांच्या या खेळापासून खूपच दूर होते.
     शेरू आल्यापासून जगूनही  आपल्या मूळगावी राहूनच जवळपासच्या गावांमध्ये जाऊन खेळ करायला सुरुवात केली . संध्याकाळी तो पुन्हा आपल्या घरी परत येऊ लागला . एवढ्याशा  शेरू मुळे त्यांचा  वणवण भटकत फिरण्याचा वनवास थांबला होता.  एकुलत्या एक मुलाला कमरेवर  घेऊन उन्हातान्हात गावोगावचा प्रवास करणे शेरु मुळे थांबले होते .उन्हाने काळवंडलेली शेवंता आता कुठे उजळू लागली होती .शेवंता कडे बघून जगुलाहीआनंद होत असे.
      असेच एक दिवस दमून झोपडीत आल्यानंतर जग्गू झोपडीत  ठेवलेल्या गाठोड्याला टेकूण बसला. मान मागे सोडून व हात बाजूला पसरून डोळे बंद करून दिवसभराचा शीण घालवण्यासाठी  जग्गू विश्रांती घेत होता .तितक्यात मागून शेरू आला व कधी नाही ते आज तो जग्गू वर खेकसून अंगावर येऊ लागला. जगुला ओरबाडू लागला. त्याच्या पायांवर चावण्याचा प्रयत्न करू लागला. त्याला ओढण्याचा प्रयत्न करू लागला. जगुला  सारे अनपेक्षित होते. जग्गूने शेरूला जवळ घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला परंतु शेरू ऐकत नव्हता . त्याच बोचकण  चालूच होते. जगु ला दिवसभराच्या थकव्यामुळे शेरूच्या अशा वागण्याने राग आला. त्याने जवळच पडलेले लाकडाच दांडा शेरुकडे  फेकून मारला .   दांडके शेरूच्या पायाला लागल्यामुळे पायातून रक्त येऊ लागले.  शेरूच्या पायातील रक्त बघून जग्गू भानावर आला. पटकन  शेरूला घेण्यासाठी जगू जागेवरून उठला त्यावेळी  शेरू मात्र अगदी शांत बसून पाय चाटू लागला .  पुन्हा  जग्गू  गाठोडयाला पाठ टेकून बसला होता त्या गाठोड्याकडे बघून   शेरू खेकसायला लागला .दात विचकायला लागला. जगूणे ते गाठोडे पटकन उचलले .गाठोड्याच्या खालीच एक काळाशार नाग फणा काढून जग्गू कडे बघू लागला. त्या नागा बरोबरच एक नागिन तीन ते चार अंड्याभोवती  शेपटीचा विळखा करून बसलेली होती. व नाग पुढे राहून जणू तिचे आणि अंड्यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करत होता. आता जगुला  शेरूचे वागणे लक्षात आले .
            जगुने पटकन शेजारीच असलेला भाला घेतला आणि सर्व ताकदीनिशी एक घाव घातला नागाने घाव चुकवला पण भाला नागिनीच्या डोक्यात बसून नागिन जागीच ठार झाली. नाग पळून गेला व दूर जाऊन थांबला . इकडे जगूणे  सगळी अंडी व नागिन बाहेर मोकळ्या जागेत आणले .त्यावर थोडा काडीकचरा टाकून पेटवून दिले .        नाग दुरून  ही सर्व घटना बघत होता. जो फणा मघाशी  वर करून  तो बघत होता तोच आता नागिन आणि अंडी यांना जळताना बघून खाली करून ना निघून गेला. 
         इकडे जगुने  शेरूच्या पायाला पट्टी बांधली आणि मनातल्या मनात म्हणाला ज्या पायामुळे आमच्या पायांची भटकंती थांबली आमच्या भटक्या जीवनाला स्थिरता प्राप्त झाली त्याच पायावर मी घाव  घातला . असे म्हणून जगूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शेरू मात्र थकलेल्या बापाला बाळ बीलगाव तसं दोन्ही हात त्याच्या खांद्यावर टाकून बिलगून बसला .
       शेवंता घाबरलेली होती .  शेरूला जवळ घेऊन ती म्हणाली ,'' लेकरा कोणत्या जन्माचं माझं पुण्य  म्हणून तू आमच्या घरात आलास . माझं सौभाग्य वाचवलं .आमचा संसार स्थिर केलास. तुझे उपकार कसे फेडू? माझ्या सुखाच्या संसारात आज मिठाचा खडा पडला असता .. तुझे उपकार या जन्मात फेडणे शक्य नाही. 
ज्याच्यामुळे आपल्या मीठ भाकरी ची भटकंती थांबली त्याचे उपकार लगेच कसे विसरलात असे म्हणून शेवंताने जगुला रागवले.
       त्यानंतर एक-दोनदा शेवंताला झोपडीच्या आजूबाजूला तो नाग दिसला. बऱ्याच दुरून तो नाग झोपडीकडे बघतो आहे असेही शेवंता ने बघितले.  शेरू आणि जीवा यांच्याबरोबर खेळणारा जग्गू यांना नाग बऱ्याचदा दुरूनच बघत होता .जणू नागाच्या मनात आपली पिल्ले ही आपल्याबरोबर अशीच खेळली असती .असा विचार चालू आहे की काय असे शेवंताला बऱ्याच वेळा वाटले.
       ह्या घटनेला दोन महिने झाले सर्वजण विसरूनही गेले परंतु कधीतरी तो नाग शेरू खेळायचा त्या लाकजवळही शेवंता ने पाहिला होता. जगूनही तीन-चार वेळा नागाला मारण्याचा प्रयत्न केला परंतु नाग जिवाच्या आकांताने पळून स्वतःचा जीव वाचवण्या मध्ये यशस्वी झाला होता.

       एकेदिवशी जगु, शेवंता ,शेरू आणि जीवा हे डोंबाऱ्याचा खेळ करून सूर्यास्ताच्या वेळी घरी परतले. सूर्य अधिकच तेजाने झळकत होता. मावळण्याआधी जणू सर्व ताकत लावून थांबण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे वाटत होते. ?  जीवा आणि शेरू आल्याबरोबर खेळण्यांमध्ये गुंग झाले. जीवा ताकत लावून चेंडू दूर फेकायचा आणि शेरू शेपटी वर करून पळत जाऊन जिवाकडे चेंडू आणून द्यायचा . त्यांचा हा खेळ खूपच रंगात आलेला होता . इकडे शेवंता स्वयंपाकामध्ये मग्न झाली होती. तर जगू थकव्यामुळे थोडासा आडवा झाला होता.
        आपल्या आयुष्यात पुढच्या क्षणाला काय घडणार याची चाहूल कधी कुणाला लागली आहे का? आणि तशी लागली तरीही घडणाऱ्या घटना या घडतातच. जीवा आणि शेरू खेळण्यात गुंग होते .लाकडांमध्ये लपलेला नाग सावकाश जीवा कडे सरकत होता.सरकत सरकत  तो नाग जीवाच्या अगदी एक दोन फुटापर्यंत येऊन पोहोचला. जीवाला दंश करणार तितक्यातच शेरूने   जिवाच्या डोक्यावरून उडी घेत नागाला पकडले .नागाने शेरूला दंश केला. आणि जीवाच्या दिशेने सरकण्याचा प्रयत्न केला तितक्यात शेरूने  नागाची शेपटी धरून त्याला मागे ओढले. नागाने तात्काळ शेरूभोवती  वेटोळे मारुन ते आवळायला सुरुवात केली .,पण शेरूने नागाचे तोंड घट्ट धरून ठेवले. नागाचे लचके तोडायला सुरुवात केली पण विश अंगात भिनलेले असल्यामुळे शेरूची  ताकत कमी पडत होती. नागाने जोराचा हिसडा देऊन तोंड सोडवले व शेरूला अजून एक-दोन वेळा दंश केला .या झटापटीत जीवा घाबरून रडू लागला होता. त्याच्या रडण्याच्या आवाजाने जगू बाहेर आला ,पण उशीर झाला होता. जगुला आलेले बघून नागाने शेरू भावती गुंडाळलेला वेढा सोडला व बाजूला जाऊन थांबला.
       थोड्या वेळापूर्वीच मावळतीचा सूर्य मावळण्याआधी जसा तेजाने तळपत होता , अगदी त्याप्रमाणेच शेरूच्या जीवनाचा सूर्य मावळण्याआधी  त्याच्या डोळ्यातील चमक अधिकच वाढली. डोळे मोठे  करून शेरू,.. जीवा आणि जगू कडे बघत होता. नाग थोड्या दुरूनच फणा वर करून सर्वांकडे बघत होता . शेरू उचक्या देत होता . क्षणार्धात जगु च्या डोळ्यासमोरुन शेरूला घरात आणल्यापासून तर आजपर्यंतचा कालखंड येवून गेला. जगुने शेरूचा एकदा जीव वाचवला पण त्याचे उपकार शेरूने स्वतःचा प्राण देऊन चुकले होते. उचक्या देणाऱ्या शेरूकडे बघून जगूच्या हातातील भाला  केव्हाच गळून पडला होता. शेरू शांततेने शेवटची उचकी देऊन कायमचा शांत झाला होता. नाग शांतपणे दुरून सर्व बघत होता पण नागालाही आता मरणाची भीती वाटत नव्हती. तो जागीच थांबलेला होता . जगुच्या अंगातही त्राण उरले नव्हत भाला ही तसाच पडलेला होता. सर्वत्र शांतता होती. फक्त वेदना मात्र दोन्हीकडे जाणवत होती.
   वेदना ही केवळ वेदनाच असते. तिला जात ,लिंग ,वंश हे काही कळत नाही. वेदनेची भाषा सर्वत्र सारखीच असते.
मुळात वेदनेला भाषा नसते तर वेदना हीच एक भाषा असते .

                        लेखन =  विजय साळवे .
Whatsapp. 9421513078 {[email protected]}


कथा कशी वाटली हे नक्की सांगा. तुमचा अभिप्राय मला पुढील लेखनासाठी प्रेरणा देत राहील...





  • सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख

  • भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  • खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

  • परीक्षा .. छान मराठी लेख.

  • हार्ट अटॅक विषयी मराठीत माहिती साठी इथे क्लिक करा.




  • .



    7 टिप्पण्या

    तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

    1. The way you write the story, words makes shine its appear in front of us as a real story. Keep it up sir

      उत्तर द्याहटवा

    टिप्पणी पोस्ट करा

    तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

    थोडे नवीन जरा जुने