1001marathiessay.blogspot.com

 
        आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात, की त्यांचे महत्त्व आपल्याला त्या जवळ असताना कळत नाही . परंतु त्या आपल्याजवळ नसल्या की त्यावेळेस त्याची किंमत कळते. अशीच एक व्यक्ती म्हणजे आई. म्हणजे बघा ना आपल्या घरात बाबांना अहो जाहो असं म्हणतो . पण आईला मात्र आपण का ग !किंवा एकेरी शब्दातच हाक मारतो.👪👪👪


👪👾👪

     आई संपावर गेली तर / आईचे महत्त्व

        आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे पद नेहमीच दुर्लक्षित राहिलेली व्यक्ती म्हणजे आई. आई आपल्या बाळासाठी सगळं काही करते पण आईच्या कामाची आणि उपकाराची जाणीव असणारे माणसे या जगात फारच थोडी आहेत.
       शनिवारचा दिवस होता. सकाळची शाळा होती . शाळा सुटल्यानंतर घरी आलो. खांद्यावरचे दप्तर तसेच पलंगावर फेकले आणि जेवायला बसलो . आईने म्हटले "हात घेऊन ये." मग नाराजीच्या स्वरात मी आईला म्हटले, " आई तू नुसता त्रास देतेस . मला भूक लागलेली आहे " पण आई म्हणाली , "हात धूवून आल्याशिवाय तुला जेवायला मिळणार नाही."आता मात्र मला खुपच राग आला. मी आईला म्हटले , "तू दिवसभर घरातच बसून असते . घरातच नुसते छोटे-छोटे काम करते . आम्हाला शाळेत खूप अभ्यास असतो. तुला अभ्यासाचं काही टेन्शन आहे का? मस्त आरामात घरांमध्येच काम करत राहायचं."
      आई मात्र आता माझ्याकडे बघून बोलू लागली.  " बरीच मोठी जीभ झाली की तुझी. अरे माझी घरातली कामे ही खूप असतात. मीही थकून जाते. तुला काय कळणार त्याचं." त्यावर मी म्हटलं ,"आई आता गप्प बस. घरात काय काम असतात तुला मला माहित आहे . आता मात्र आई बोलायचे बंद झाली . मनात कसला तरी निश्चय करून मला जेवणाला देऊन तिथून निघून गेली."
      दुसऱ्या दिवशी रविवार होता . आई मला आता आवाज देईन आणि उठेन . असे मला वाटत होते. परंतु आज आईचा आवाज काही येत नव्हता. तसाच मी उठलो आणि आईला सांगितले," मला चहा करून दे .आईने फक्त माझ्याकडे बघितले आणि पुन्हा  पुस्तक वाचू लागली. " ठीक आहे ,अंघोळीसाठी गरम पाणी तर काढून दे .  पण आई पुस्तक  वाचण्यात मग्न होती.
      मी आईचा हात धरुन तिला हलवले आणि विचारलं, " आई तुला आज काय झालेले आहे ? तु का बोलत नाहीस ? आता आईने पुस्तकातून डोके वर काढले आणि मला म्हणाली, " मी आज संपावर आहे . जशी तुम्हाला आज सुट्टी आहे तशी मी आज पासून दर रविवारी सुट्टी घेणार आहे."
       आईचे बोलणे ऐकून मला झटकाच बसला , पण आई पुन्हा पुस्तक वाचन्यामध्ये मग्न झाली. मग मीच पाणी काढून घेतले . आंघोळ केली .आंघोळ केल्यानंतर सर्वप्रथम मी बाबांना उठवले . सर्व प्रकार बाबांना सांगितला .ते पटकन उठले .आंघोळ केली . मग बाबांनी चहा बनवला, पण त्या चहाला आईच्या हाताची चव नव्हती .कसा तरी तो चहा पिला . आता मात्र सकाळच्या नाश्त्याची वेळ झाली होती. 
        चहा तर पिला बाबांच्या हातचा , पण नाश्ताही बाबांच्या हातचा खायचा म्हणजे फारच मोठं आव्हान होतं. मग आम्ही हॉटेलमधून नाश्ता मागवला  आणि तो खाऊन थोडसं  दूरदर्शनवर चित्रपट बघू लागलो. तितक्यात दुपारच्या जेवणाची वेळ झालेली होतीच. आई दूरून आमची गंमत बघत होती, पण ती काहीही बोलली नाही . आई उठली तिने गॅस चालू केला आणि स्वयंपाक बनवला. आम्ही पुन्हा खुर्चीत जाऊन बसलो आणि टीव्ही बघू लागलो . थोड्यावेळात ताटामध्ये जेवण वाढून घेऊन आली आणि आमच्या शेजारच्या खुर्चीत बसूनच जेवण करू लागली.
         आईने छान शिरा बनवलेला होता . आमच्या कडे लक्ष न देता आई जेवत होती .आमच्या पोटात कावळे चांगलेच ओरडू लागले . वाटलं आईच्या ताटातच जेवायला बसावे . पण काहीसा पुरुषी अहंकार आडवा येत होता ना ! मग टीव्ही बघत बसलो . पोटातले कावळे देखील ओरडायचे बंद झाले . संध्याकाळच्या चहाची वेळ झाली . त्यावेळेस बाबांनी पुन्हा चहा बनवला . तो चहा कसा तरी पीला आणि आता रात्रीच्या जेवणाच काय असे विचार मनात येऊ लागले.
        दिवसभराच्या उपवासाने मात्र रात्र उपवाशी काढणे अत्यंत अवघड होते . असे असून देखील आमचे मन आई ची माफी मागण्यास तयार होत नव्हते . पण आईनेही आज जणू चंगच बांधलेला होता की ,तिच्या कामाचे महत्त्व पटवून द्यायचे.पण तरीदेखील आम्ही हार मानायला तयार नव्हतो. बाबांनी रात्रीचे जेवण बाहेरून मागवले . ते जेवण आम्ही पोटभर जेवलो . आईनेही स्वतःसाठी जेवण बनवले . आई जेवली आणि झोपली.
          दुसर्‍या दिवशी सोमवारी सकाळी मला शाळेत जाण्याची घाई होती . बाबाही ऑफिसला जाण्यासाठी घाईत दिसत होते. सकाळी लवकर उठलो. आंघोळ केली, चहाही स्वतः केला. परंतु आता मात्र आमच्या नाकी नऊ आले होते . तितक्यात शाळेला जाण्याअगोदर डबा आणि नाश्ता तयार करण्याची आमच्यावर वेळ होती . तिकडे आमचे एकही साहित्य सापडत नव्हते .कपडे इस्त्री केलेले नव्हते. त्यामुळे आमची चांगलीच गोची झाली.
        आता मात्र आमची चांगलीच पंचाईत झालेली होती. आईच्या कामाचे महत्त्व आम्हाला पटू लागले होते. आई दररोज घरात किती काम करते याचा अंदाज आम्हाला आला . आमच्या मनातील सर्व विचार बदलून गेले होते. मी आणि बाबा दोघेही आईजवळ गेलो . आईला सांगितले ,"आई माझी चूक झाली. मी तुला तसे बोलायला नको होते . तू आमच्या पेक्षाही जास्त कामे घरात करत असते . तुझ्याशिवाय आमची कामे होऊच शकत नाही . आई  माझी चूक झाली मला माफ कर."
        आई मात्र आता माझ्याकडे बघत होती . आईच्या चेहर्‍यावर हसू होते . तिने दोन्ही हात पसरून मला जवळ बोलावले . मी आईच्या कुशीत कसा सामावलो, मलाच कळले नाही . नकळत माझ्या आणि तिच्या दोघांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या..
        माझ्या मनात आता एक विचार पक्का झालेला होता . आई  जगातली अशी व्यक्ती आहे, की जी आपल्या मुलांवर आणि कुटुंबावर निर्व्याज प्रेम करते . तिला फक्त देणं माहीत असतं . त्याबद्दल तिची फक्त थोड्या प्रेमाची अपेक्षा असते . मला हि गोष्ट कळली ,पण तुम्हीही ती लक्षात ठेवा.




Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने