1001marathiessay.blogspot.com

शालेय जीवनात खेळाचे महत्व मराठी निबंध, Shaley jivnat khelache mahatva essay in Marathi

         केव्हा शालेय जीवनातच खेळाचे महत्व आहे असे अजिबात नाही . जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे बालपणी, किशोरावस्था ,तारुण्यावस्था, युवा अवस्था या सर्वांमध्ये खेळाचे विशेष महत्त्व आहे .अर्थातच वयोमानानुसार खेळण्याच्या पद्धतीही बदलत जातात. खेळण्याच्या पद्धती जरी बदलत असल्या तरी देखील जीवनामधील खेळाचे महत्त्व अजिबात कमी होत नाही.
         शालेय जीवन जगत असताना भविष्यातील एका सक्षम व जबाबदार व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. ही जडणघडण निकोप होणे अत्यंत आवश्यक आहे. निकोप व्यक्तिमत्व घडण्यासाठी आवश्यक आहे निकोप आरोग्य. आरोग्य चांगले असेल तर निश्चितच जीवनातील कोणत्याही क्षेत्रामध्ये मनुष्य प्रगती करू शकतो त्यामुळेच तर असे म्हटले जाते ना कि,
      सुदृढ  शरीरातच सुदृढ मन वास करते.
        ज्याप्रमाणे एखाद्या घराच्या मजबूत बांधकामासाठी त्याचा पाया मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे अगदी त्याच पद्धतीने एक परिपूर्ण नागरिक करण्यासाठी शालेय जीवनापासूनच शारीरिक वाढ योग्य पद्धतीने होणे अत्यंत गरजेचे आहे. शालेय जीवनाचा काळ हाच खरा आयुष्याचा रचना काळ असतो. शालेय जीवनात भरपूर खेळणारी माणसे किंवा व्यक्ती पुढील आयुष्यामध्ये ही आनंदी जीवन जगत असल्याचे निदर्शनात येते अर्थात त्यालाही शिस्त आणि नियम हवेत.
         खेळांचे विविध प्रकार असतात बैठे खेळ ,मैदानी खेळ ,सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ आणि या प्रत्येक प्रकारच्या खेळांमध्ये विविध प्रकारचे गुण खेळाडूंच्या अंगी बनवले जातात.
         कबड्डी खो-खो क्रिकेट हे मैदानी खेळ आहेत . त्याच पद्धतीने हे सांघिक खेळ ही आहेत. सांगित खेळ खेळत असताना संपूर्ण संघाला आपल्यासोबत घेऊन विजयापर्यंत नेणे ही एक जबाबदारी असते अशा खेळामुळे संघभावना निर्माण होते व एकत्रित पणे काम करण्याची वृत्ती अंगी बनवली जाते. संघाचा नायक म्हणून काम करत असताना आपल्या संघातील प्रत्येक खेळाडू मधील गुण आणि दोष कोणकोणते त्याच्या क्षमता कोणत्या त्यांच्या अनुसार त्याच्याकडून कसे काम करून घ्यावे असा नेतृत्वगुणही खेळामुळे विकसित होतो. मिळून मिसळून ध्येय साध्य करून घेणे हा एक महत्वाचा नेतृत्वगुण अशा खेळामुळे निर्माण होतो भविष्यातील चांगल्या नेत्यांच्या निर्मितीसाठी हा गुण अत्यंत आवश्यक आहे.
          वैयक्तिक स्वरूपाचे खेळ जसे की , पकडापकडी चोर-पोलीस, विटी-दांडू ,लंगडी ,दोरी उड्या, धनुर्विद्या, बुद्धिबळ यांसारख्या खेळामुळे आपल्या स्वतःच्या जीवावर विजय खेचून आणणे हे मोठे कौशल्याचे काम करण्याची उर्मी आपल्यामध्ये निर्माण होते. एखाद्या घटनेची जबाबदारी स्वतः स्वीकारणे त्या घटनेत आलेले यश किंवा अपयश हे आपल्यामुळे आले आहे हे स्वीकारण्याची खेळाडू वृत्ती देखील अशा खेळामुळे निर्माण होते.
         खेळ कोणत्याही स्वरूपाचे असो खेळामुळे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचे अवलोकन करणे त्यानुसार योग्य तो निर्णय घेणे तो निर्णय योग्य ठरवण्यासाठी विविध उपाययोजना करणे त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे. येणाऱ्या समस्या अडचणी यांच्यावर चौकसपणे नजर ठेवणे व त्या सोडवण्यासाठी एकत्रित किंवा वैयक्तिक पद्धतीने प्रयत्न करणे हे असे अनेक आवश्यक गुण व्यक्तीमध्ये खेळामुळे निर्माण होतात.
         शालेय जीवनातील खेळाचे महत्व ह्यामुळेच अधिक वाढते ., कारण की शालेय जीवनात व्यक्तीमध्ये हे गुण एकदा अंगी बनवले गेले तर भविष्यात येणाऱ्या अनेक अडचणी आणि समस्यांना तोंड देण्यासाठी लहानपणापासूनच मुले मानसिक दृष्ट्या सक्षम होतात.
          खेळामुळे बऱ्याचदा आपल्याला आपल्या गुणांचा कसा वापर करून घ्यायचा याचीही जाणीव होते. जगामध्ये कशाप्रकारचे जीवघेणी स्पर्धा सुरू आहे हे तर आपणा सर्वांना माहितच आहे या जीवघेण्या स्पर्धेमध्ये मुले टिकावीत यासाठी शालेय जीवनामध्ये खेळ खेळणे हे अत्यंत आवश्यक आहे खेळामुळे यश अपयश पचवण्याची आपले इच्छित कार्य पूर्ण करण्याची जिद्द प्रसंगी माघार घेणे तर प्रसंगी आक्रमकता स्वीकारणे प्रसंगावधान राखणे अशाप्रकारचे आवश्यक गुण व्यक्तीमध्ये शालेय जीवनापासूनच निर्माण होतात.
        शालेय जीवनात खेळामुळे मुलांच्या वर्तनात जे बदल घडून येतात ते आजन्म त्यांच्या वागण्यात, बोलण्यात व व्यक्तिमत्त्वात स्थिर होऊन जातात. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आवश्यक असे मनुष्यबळ जर भविष्यात तयार करायचे असेल तर मी शालेय जीवनापासूनच खेळांचे महत्त्व लक्षात घेऊन लहान वयातच मुलांना खेळण्याची सवय लावावी व त्यांच्यामध्ये एका निकोप व्यक्तिमत्त्वाची वाढवण्यासाठी मार्ग मोकळा करून द्यावा.


या निबंधाचे खालील ही नावे असू शकतात
१) खेळाचे महत्व.
२) विद्यार्थी जीवनात खेळाचे महत्व.
३) जीवनातील खेळाचे महत्व
४) खेळ खेळण्याचे फायदे.
५) खेळाचे उपयोग स्वमत
६) आपल्या जीवनात खेळाचे महत्व
७) आपल्या जीवनात खेळाचे महत्त्व तुमच्या शब्दात       लिहा.
८) जीवनातील खेळाचे महत्व यावर तुमचे मत लिहा.





Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने