1001marathiessay.blogspot.com


या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे कल्पनाविस्तारात्मक मराठी निबंध.




    आयुष्य म्हणजे सुखदुःखाचा लपंडाव. जीवन जगत असताना, कधी आनंद असतो तर पुढच्या क्षणाला दुःख वाट्याला येते. सुखदुःखाची ही अनिश्चितता सर्वांना माहीत आहे परंतु तरीदेखील जीवनात येणाऱ्या दुःखाकडे मनुष्य नकारात्मक दृष्टीनेच बघतांना दिसतो.
       'आता हे जगणं नकोसं झालं आहे', ' अरे देवा, सोडव बाबा या चक्रातून एकदा !'.असे देवाला विनवणी करणारे पुष्कळ लोक आपल्याला पदोपदी भेटतात . अगदी छोट्याशा अपयशाने खचुन काहीजण आत्महत्या देखील करतात, आणि आपले अमूल्य जीवन संपवून टाकतात.अशा कचखाऊ वृत्तीच्या लोकांना कवी मंगेश पाडगावकर समजावण्याच्या स्वरात सांगतात की,  या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

      अगदी मनापासून विचार केला आणि डोळे उघडे ठेवून आपण जर आपल्या आजूबाजूला निरीक्षण केले, तर आपल्याला अशा बऱ्याचशा गोष्टी आढळतील की ज्या आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देत असतात. निसर्ग तर नित्यनेमाने आपल्याला जीवनातील सुंदरता दाखवून देत असतो. उंच डोंगरावरून कोसळणाऱ्या जलधारा , पावसामुळे भिजलेली काळी माती, घोंघावणारा चंचल वारा आणि मातीतून वर आलेली रोपांची नाजुकशी पाती आणि त्या पानांमध्ये फुलणारी सुंदर गोजिरी अशी हळवी फुले . या एवढ्या सुंदर गोष्टी माणसाला जीवन किती आनंददायक आहे याची जणू जाणीव करून देत असतात.
      वैशाखवणव्यात होरपळून निघालेल्या धरणीमाते वर ज्यावेळी हा मेघराजा जलाचे आंदन धरणी मातेच्या कुशीत टाकतो, त्या वेळी सगळीकडे मोहक सुगंध दरवळू लागतो. इतक्या सुखाचे प्रसंग निसर्ग प्रत्येक ऋतुमानानुसार आपल्याला देत असतो. तरी देखील लोक निराश आणि वैफल्यग्रस्त झाल्याचे दिसून येतात. सुखाचे, आनंदाचे क्षण हे सदैव आपल्या आजूबाजूलाच असतात. फक्त ते आपल्याला शोधता आले पाहिजेत. त्यामुळे निराश होण्याचे अजिबात कारण नाही. असे कविवर्य बा. भ. बोरकर आपल्या एका छानशा कवितेत सांगतात.

       खरं पाहता आपले आयुष्य आपण जगणे ही गोष्टच किती आनंददायक आहे. परंतु मनुष्य जन्मभर असा जगतो की कधी मरणारच नाही आणि एक दिवस असा  मरतो की कधी आयुष्य जगला नाही.एखादा बालक ज्यावेळेस आपल्या आई-वडिलांच्या सहवासात असतो त्यावेळेस त्याला प्रेमाचे कितीतरी क्षण मिळतात . आईचा हात मोरपिसासारखा पाठीवरून फिरत असतो. तो आनंद पैशाने कुठून विकत आणता येणार आहे का? शेतकरी गोठ्यातील बैलांना ज्यावेळी हिरवागार चारा खाऊ घालतो. त्यावेळी शेतकऱ्यांच्या मनातील समाधान आणि त्या मुक्या जनावरांच्या डोळ्यातील कृतज्ञता, प्रेम आणि भाव आपल्याला जगण्याची प्रेरणाच देत असते. मुक्या जनावरांना देखील आयुष्याची ही सुंदरता कळते तर माणसाला का कळत नाही ? हा एक अजबच सवाल आहे.
           मनुष्याशी संबंधित ज्या विविध भावना आहेत, जसे की देशभक्ती ,प्रेम, राग ,द्वेष इत्यादी. या सर्व भावना मनुष्य जिवंत असतानाच व्यक्त करू शकतो ना ! जिवंतपणीच एखाद्या वरचे प्रेम आपण व्यक्त करू शकतो. आपण ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीचे ऋणही आपण जिवंत असतानाच व्यक्त करू शकतो. हे ऋण व्यक्त करताना कवी पाडगावकर म्हणतात,
 या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती 

 अनंत मरणे झेलून घ्यावीत इथल्या जगण्यासाठी 

इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे 
या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.


 


         
     
     

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने