1001marathiessay.blogspot.com
 व्यसन कोणतही असलं तरी ते वाईटच .व्यसनाचे आपल्या शरीरावर आपल्या व्यवसायावर संबंधांवर वाईट परिणाम होतात याच प्रकारे दारूचे ही एक व्यसन आहे. दारूचे हे व्यसन आपल्या प्रगतीला वेसण घालते . दारूच्या व्यसनामुळे संसार उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आपल्याला गावागावांमध्ये पाहायला मिळते. दारुड्या माणसाच्या घरातील स्त्रिया ह्या नेहमी लंकेतील पार्वती असल्या सारख्याच दिसतात  . देवळांमध्ये ही एवढी गर्दी राहणार नाही इतकी गर्दी दारूच्या दुकानासमोर बघायला भेटते बघाना किती आश्चर्य आहे चांगल्या गोष्टी माणसाला शिकावे लागतात परंतु वाईट गोष्टी मनुष्य आपोआपच शिकून जातो .
               परमेश्वरा अजब तुझा दरबार.
                  चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आता आपण एक निबंध बघूया दारूचे व्यसन.
                       या निबंधामध्ये दारूमुळे होणारे दुष्परिणाम आपण बघूया.
                                   
                  दारूचे दुष्परिणाम
                 व्यसन कोणत्याही प्रकारचे असो ते आपल्या आयुष्याची राखरांगोळी केल्याशिवाय राहत नाही .आपण आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी करतो त्या प्रत्येक गोष्टीवर व्यसनाचा परिणाम हा होतच असतो. आणि हा परिणाम नक्कीच वाईट असतो .आपली नाती, कौटुंबिक संबंध, सामाजिक संबंध ,मित्रांबरोबरचे संबंध तसेच इतर सर्व क्रियांमध्ये या व्यसनाचा परिणाम नक्कीच दिसून येतो.
                    व्यसन कधी एक गंभीर समस्या बनून जाते हे आपल्याला कळतही नाही. दारूसारख्या व्यसनामुळे यकृताचे आजार ,कर्करोग म्हणजेच कॅन्सर यासारखे दुर्धर आजार होतात. म्हणून दारूचा संग न केलेलाच बरा.
                   दारू पिणारे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी विविध प्रकारची दारू पितात ,आणि या दारूना वेगवेगळ्या प्रकारचे नाव देऊन जाहिरातींमध्येही ही भडकपणे दाखवले जाते.बरेच जण या जाहिरातींना बळी पडून व्यसनाच्या आहारी गेल्याचेही ही दिसते. ज्या घरातील व्यक्ती किंवा कर्ता पुरुष हा व्यसनाच्या आहारी गेलेला असतो बऱ्याचदा त्या घरातील मुलेही त्या व्यसनाच्या आहारी जातात .तसेच संस्कारांपासून मैलोन् मैल दूर असतात. अर्थात अशा परिस्थितीतही काही मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते यशही मिळवतात ;परंतु असे कर्तुत्व धुरंदर फारच थोडे.
                 याठिकाणी एक गोष्ट मला सांगाविशी वाटते की दारू विकणाऱ्यांनी घरे बांधलेत आणि  दारू पिणाऱ्याची घरे गहाण पडलीत . म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो व्यसनाच्या आहारी गेलात तर ते व्यसन कधी तुम्हाला त्याचा आहार बनवेल हेदेखील कळणार नाही. 
                                  भारत हा तरुणांचा देश आहे असे म्हटले जाते. परंतु या तरुणांचे छाती या दारूच्या व्यसनाने लोहाराच्या भात्यासारखी फूस फूस करायला लागलेली आहे. पालकांचेही मुलांच्या संवर्धनाकडे काहीसे  दुर्लक्ष झाल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येते .ज्या देशातील तरुणच पोकळ असतील त्या देशाची प्रगती कशी होईल. म्हणून दारूसारख्या व्यसनामुळे आयुष्याचा नाश करून घेऊ नका..
                 आता तर  सध्याच्या काळात महिलानाही समान हक्क आहे.  बर्‍याच ठिकाणी दारू  सेवन करण्यातही महिला हा हक्क बजावताना दिसतात. बऱ्याच ठिकाणी महिलाही पुरुषांबरोबर दारू पीत असल्याचे दृश्य आपल्याला बघायला मिळते . गरिबीने गांजलेल्या किंवा झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या बऱ्याच महिलाही दारू या व्यसनाच्या आहारी गेलेल्या दिसतात.
         दारूच्या सेवनामुळे शरीरावर खालील दुष्परिणाम होतात.
  1. दारुमुळे जठराला सूज येते.
  2. पोटाचा अल्सर होतो तसेच पचनाच्या अनेक समस्या निर्माण होतात.
  3. दारूचे अति सेवन केल्यामुळे उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लडप्रेशर चा त्रास होऊ शकतो.
  4. दारूच्या सेवनामुळे महिलांमध्ये मासिक पाळीच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
  5. गरोदरपणाच्या काळामध्ये स्त्रियांनी जर दारूचे सेवन केले तर पोटातील बाळावर परिणाम होऊन विकृत बाळ जन्माला येऊ शकते.
  6. दारुमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढते.
  7. दारूच्या व्यसनामुळे तोंड यकृत घसा व स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो.
        हे सर्व दुष्परिणाम लोकांना माहित नाही अशातला अजिबात भाग नाही ,पण तरीही लोक दारू प्यायचं थांबवणार नाहीत ,आणि थांबत नाहीत.  कुत्र्याची शेपूट नळीत घातलं तरी ते वाकडेच .असे म्हणायची वेळ आलेली आहे.
माझी दारू पिणार्यांना एक नम्र विनंती आहे की दारू पिण्याआधी आपल्या घरी असलेल्या आपल्या माणसांचा थोडा विचार करा. तुमच्यावर अवलंबून असलेल्या तुमच्या मुलाबाळांचा आणि त्यांच्या भविष्याचा थोडा विचार करा.
             

        या निबंधाचा चांगला अभ्यास करा व तुम्ही तुमच्या शब्दात ही निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा
              या निबंधाचे नाव खालील प्रकारचे असू शकतात . 

  1.     दारूचे व्यसन व्यसन करी घात 
  2. व्यसनाच्या नादी लागू नका आयुष्य बरबाद करू नका






Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने