Essay in Marathi on trip to wildlife sanctuary
Majhi abhayaranyas bhet marathi nibandh.





 माझी अभयारण्यास भेट.
Majhi abhayaranyas bhet marathi nibandh.


        नमस्कार मित्रहो मी आज माझ्या आयुष्यातील एक हृदयस्पर्शी घटना तुम्हाला सांगत आहे .माझं गाव नाशिक जिल्ह्यातील तहाराबाद.

      एके दिवशी मी शाळेत गेलो होतो आणि संध्याकाळी जेव्हा शाळेतून परत आलो तेव्हा घराजवळच्या चौकात गर्दी बघितली आणि झटकन दप्तर दरवाजातूनच आत फेकून चौकात धाव  घेतली . लोकांच्या गप्पा ऐकल्या, नंतर लक्षात आलं की चौकात राहणाऱ्या सदा मामाच्या बकऱ्या वाघाने नेल्या . " वाsssघ "बापरे!  वाघ शब्द ऐकल्याबरोबर मला दरदरून घाम सुटला आणि तसाच माघारी घरी आलो.


दुसऱ्या दिवशी सकाळी सरपंच आणि गावातल्या इतर वडीलधाऱ्या मंडळींनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं आणि त्याच्या मदतीने वाघाला पकडण्याची योजना तयार केली . त्यासाठी सापळा तयार करण्यात आला, व नंतर  लावण्यात आला. दोन दिवस झाले पण तरीही वाघ सापळ्यात सापडला नव्हता ;पण वाघाने गावातून आणखी दोन बकऱ्या नेल्या होत्या; आणि एके दिवशी मी सकाळी शाळेत जाण्याची तयारी करत असताना अचानक "वाघ अडकला ""वाघ पकडला" " धावा धावा" अशा आरोळ्या कानावरती येऊन धडकल्या. धावतच मी पण वाघ बघायला गेलो. केवढा मोठा जनसमुदाय होता तो आणि त्याहीपेक्षा भयानक होता तो पिंजऱ्यातला वाघ. केवढा रुबाबदार ,अंगावर पट्टे आणि मजबूत शरीर. असा हा वाघ बघत असतानाच त्याने डरकाळी फोडली आणि माझ्या मनात अगदी थयथयाट झाला. पिंजऱ्यात बंद असूनही माझे पाय भीतीने लटलट कापत होते . वाघ मात्र बाहेर येण्याच्या प्रयत्नात आपलं डोकं  पिंजऱ्याच्या  गजावर आपटत होता .त्यामुळे त्याचे डोके फुटून त्यातून  रक्तस्त्राव सुरु होता. त्यामुळे तो वाघ अधिक भयानक वाटत होता. त्या वाघाला दाजीपूर अभयारण्यात नेण्यात आले.

        वाघाच्या विचारानेच मी रात्री झोपी गेलो, आणि बघतो तर काय मी होतो दाजीपुरा अभयारण्यात . त्यात फिरत असताना मी एकटाच होतो; आणि इकडे तिकडे बघत चालत असताना माझ्यासमोर एक तारेची जाळी दिसली आणि त्यात होता जंगलाचा राजा सिंह त्याला बघून मी दचकलोच ,पण तो चक्क माझ्याशी बोलू लागला. तो म्हणाला," अरे बाबा ,आलास आम्ही कसे आहोत ?कसे दिसतो? ते बघायला, मग बघ ,आम्ही कसे येथे स्वतःचे स्वातंत्र्य गमावून बसलोय आणि जगतोय एक लाचार जीणं, पण याला लाचार म्हणनेही चुकीचे ठरेल. इथला कारभार पाहणारे लोक घेतात माझी काळजी; पण अरे स्वतःचं राज्य ते स्वतः असतं ,नाही का! मी आणि माझे इतर मित्र जगताय तिथे आपलं स्वातंत्र्य गमावून परंतु एक गोष्ट लक्षात असू दे की माणसांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी व आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी झटलंच पाहिजे . असो जा तू पुढे इतरांना भेटून ये."

       सिंह राजाच बोलणं ऐकून पुढे निघालो .पुढे भेटला एक मोर. मोर मात्र लाजून गप्प बसलेला होता .  मी त्याला म्हणलं "बाबा रे, तु का बोलत नाहीस माझ्याबरोबर त्या सिंहराजा सारखा " त्यावर मोर आपले डौलदार मान वर करून व पिसारा फुलवून हलक्या आवाजात म्हणाला ,     " तुम्ही लोक आम्हाला बघायला येथे येतात, सोबत खायला घेऊन येतात, पण त्याची जी घाण आणि केरकचरा असतो तो इथेच टाकून जातात . त्यामुळे आम्हाला त्रास होतो रे .तुमच्या घरात दुसऱ्याने कचरा केला तर तुम्हाला कसं वाटेल ?मग तुम्ही माणसं आमच्या घरात का घाण करता?" " इथून पुढे असं करणार नाही ." असे वचन मी मोराला  दिले आणि मग त्याने आपले सुंदर पंख पसरले आणि गोड आवाजात गाऊ लागला 

             

              जीवन गाणे गातच रहावे 

             झाले गेले विसरून जावे

             पुढे पुढे चालावे 

             जीवन गाणे गातच राहावे 

तेच गाणे गुणगुणत मी पुढे गेलो.

पुढे गेल्यावर तिथे दगडासारखी कठीण दिसणार्‍या कातडीची मगर , अंगावर काटे असलेले साळींदर , अतिशय चपळ असा चित्ता, आपले पूर्वज समजले जाणारी माकडे ,अंगावर रंगीत ठिपके असलेले सुस्त अनं मस्त अजगर ;आणि अंगावर टिकल्या असलेला बिबट्या. असे वेगवेगळे प्राणी पक्षी बघत पुढे जात असताना मल्लांच्या कुस्तीचा आखाडा असतो अशा एका कड्यापर्यंत पोहोचलो आणि आत बघतो तर काय काळेशार ,ठिपकेदार , लाल पट्टेवाले , पिवळेधमक असे बरेचसे भयानक व आकर्षक साप बघितले आणि क्षणभर भीती वाटली

. पण थोड्याच क्षणात त्यातल्या भयंकर वाटणाऱ्या काळ्या सापाला मी म्हटलं "काय रे गड्यांनो , मित्रांनो कसे आहात?" त्यावर तो म्हणाला,"जे आहे ते चांगलंच म्हणायचं."तितक्यात एक माणूस दोन उंदीर घेऊन आला आणि त्याने ते त्या खड्ड्यात टाकले मला वाटलं उंदीर खड्ड्यात  टाकल्याबरोबर त्यातले साप त्यांना खाण्यासाठी आपापसात भांडतील पण तिथं तसं काही घडलं नाही . याबद्दल मी विचारल्यावर तो साप म्हणाला, " रानातले मोकळे उंदीर, बेडूक पकडून खाण्याची मजाच वेगळी असते रे " .मी विचारलं , "मग तू इथे कसा आला?" यावर साप म्हणाला, "एका शेतात होतो मी, त्या शेतमालकाचा एक कुत्रा होता आणि एके दिवशी मी रानात जात असताना त्या कुत्र्याने माझ्यावर झडप घातली. काहीही कारण नसताना. मग मीही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याला दंश केला. कुत्रा जागीच खलास झाला ; पण मला त्यामुळे जखम झाली होती, मुंग्या लागू नये यासाठी मला किती त्रास सहन करावा लागला ,ते माझं मलाच माहित . आता मला सांग ,स्वतःचं रक्षण करणे वाईट असतं का ? मी म्हणालो ,"नाही " . त्यावर साप म्हणाला "पण , त्या शेतकऱ्याने तिथल्या माणसांना बोलावून इथं पकडून आणलं मला." मी म्हणालो ,"त्याला वाटलं असेल की, तू जर त्यांच्या घरातल्या इतरांना चावला तर....."  मी असं बोलल्या बरोबर साप रागातच म्हणाला ,"आम्हाला काही वेड लागल कोणालाही चावायला ?आमचं नाव घेतलं, त्रास दिला तरच आम्ही स्वतःच्या रक्षणासाठी दंश करतो. तु आता इथून जा " . साप जरा रागात बोलल्यामुळे मी तिथून निघालो आणि मनात विचार केला की पुढच्यांशी कसं बोलावं जाता जाता मला एक गीत ऐकायला आले                     

               जिंदगी का सफर 

                हें यह कैसा सफर 

               कोई समझा नही 

                कोई जाना नही

मी घाईत पुढे गेलो आणि बघतो तर काय एका विशाल गजराजा च्या अंगावर बसून एक कोकिळ पक्षी हे गाणे गुणगुणत होता. मी त्या गजराजाला विचारले ,"गजराज ,तुम्ही दोघं मजेत दिसताय?" गजराज म्हणाला,"मजेत म्हणजे काय ,खूप मजेत ,अरे काय कमी आहे इथे ? इथे गवत आहे पक्षी आहेत, झाडे आहेत सगळंसगळं आहे बघ !हा पण एक आहे स्वातंत्र्य ते स्वातंत्र्य असतं पण इथं माणसं आमची खूप काळजी घेतात. कुणी आजारी असलं की लगेच त्याला औषध देतात. खायला देतात .मी म्हणतो की, अभयारण्य काढल्यामुळे आमच्या तसेच इतर काही प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्यापासून वाचल्या आहेत. प्राण्यांना संरक्षण मिळाले आहे म्हणून मी सर्व प्राण्यांच्या वतीने तुम्हा माणसांचं ऋण व्यक्त करतो." मी म्हणालो गजराजा तुला तरी जाणीव आहे आमच्या काळजीची आमच्या विचारांची तुम्हीच आता आमची ही काळजी तुमच्या या इतर सगळ्या मित्रांना पटवा". असं सांगून मी गजराजा चा निरोप घेतला .

      काही अंतर चालून पुढे जातो न जातो तोच माझ्या अंगातले राहिलेलं अवसान गळून पडलं कारण माझ्या समोर आला होता कालच आमच्या येथून पकडून आणलेला वाघ ,आणि तोही मोकळाच म्हणून मी घाबरुन तेथून पळणार तेवढ्यात वाघ मला म्हणाला," अरे मित्रा थांब जरा " वाघ बोलल्यावर मी थांबलो आणि वाघाने बोलायला सुरुवात केली ."अरे मित्रा काल मला पकडलं होतं तिथं तूच उभा होतास ना माझ्यासमोर?". मी होय म्हणलो .त्यावर वाघ म्हणाला "हे बघ माझ्या डोक्यावर येथे हात ठेव . मी हात ठेवल्यावर माझ्या हाताला वाघाचं तो पिंजऱ्याला धडकताना निघालेलं रक्त लागलं. ते बघून फार वाईट वाटलं. वाघानं पुन्हा बोलायला सुरुवात केली ."अरे ,मी वाघ जंगलातून ,रानातून मुक्तपणे फिरायचं, राजासारखं राहायचं शिकार करायची आणि स्वाभिमानाने जगायचं ,पण आता इथे आल्यावर 

...... " तितक्यात मी म्हणालो " मग तू आमच्या गावात येऊन शेळ्या का खाल्ल्यास? "यावर वाघ म्हणाला "याचे उत्तर तुम्ही माणसांनी तुमच्या मनालाच विचारा .अरे तुम्ही वृक्षतोड केली जंगले नाहीशी केलेत आम्ही कुठे जायचं काय खायचं सांगतोस?". यावर मी वरमलो आणि मान खाली घातली . वाघाने पुन्हा बोलायला सुरुवात केली . "इथे सगळ्यांची काळजी घेतात रे ,पण स्वतःचं राज्य स्वतःचच असतं. आता तुझ्या हाताला माझ्या मस्तकाच रक्त लागलेल आहे. त्या माझ्या मस्त कातच स्वाभिमानाने जगायचं आणि स्वाभिमानाने मरायचं असा विचार पक्का आहे , आणि माझं स्वातंत्र्य गेलं म्हणून मीही जाणार . इथून पळण्याच्या  प्रयत्नातच मी आहे आणि आता तुझ्यासमोर मुक्तपणे उभा आहे .पण हे स्वातंत्र्य फार काळ नाही माझ्या मस्तकातुन बरच रक्त गेलंय ,तसंच माझा प्राणही जाणार आहे .हे  ऐकून मी दचकलो आणि वाघ तिथून पळून एका खडकावर गेला आणि तिथून धाडकन खाली कोसळला . मी वाघाकडे धावत गेलो तोच धाडकन आवाज येऊन मी जागा झालो. बघतो तर काय मी पलंगावरून खाली पडलो. डोकं जमिनीवर आपटला म्हणून मी डोक्याला हात लावला . मनात विचार आला की हाताला वाघाचं रक्त लागलय, म्हणून हात बघितला आणि सत्य जाणून स्वप्नातुन बाहेर आलो. त्या विचारातच आंघोळ वगैरे करून शाळेत गेलो .पण दिवसभर वाघाचा विचार माझ्या डोक्यात घोळत होता आणि संध्याकाळी घरी परत आल्यावर गावात चर्चा ऐकली की तो वाघ मेला. पण माझ्या मनात पक्का विचार होता की वाघाने स्वतःचा स्वाभिमान व स्वातंत्र्य वाचवण्यासाठी आपला प्राण दिला. वाघाच्या रक्ताने स्वप्नात भरलेला हात बघतच माझ्या डोळ्यात पाणी दाटलं आणि वाघाने सांगितलेला स्वाभिमानाचा धडा आठवला.  खिन्न मनाने घरात गेलो पण माझी अभयारण्यास झालेली भेट माझ्या आजन्म स्मरणात राहील आणि वाघाने व सिंहाने शिकवलेला धडाही.

                                  धन्यवाद


💐💐💐💐💐💐💐💐💐💐



 सर्व निबंधांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.

         कृपया  ई-मेल टाकून subscribe करा,,म्हणजे नंतर कधीही टाकलेल्या निबंधाची लगेच तुम्हाला माहिती मिळेल ,  आणि अधिकाधिक share करायला अजिबात विसरू नका म्हणजे अजून निबंध लिहीण्यासाठी मला प्रेरणा मिळेल .

               खूप खूप धन्यवाद

☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️


      आणि सर्वात महत्त्वाचं तर राहीलच ...निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि काही सुधारणा असतील तर सुचवा आपल्या सूचनांचे सहर्ष स्वागत.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने