www.upkarmarathi.com

राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन, National safe motherhood day.

     11 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या आरोग्यासाठी कृती करण्याचा आंतरराष्ट्रीय दिन 28 मे रोजी साजरा केला जातो. मातृत्व ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची अशी अवस्था आहे. गरोदरपणा प्रसूती व प्रसूती नंतर चा सहा आठवड्यांचा कालावधी स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. प्रसूती ही नैसर्गिक क्रिया असली तरी सुमारे पाच टक्के महिलांमध्ये या काळात गुंतागुंत निर्माण होऊ शकते याची परिणीती मातेच्या तसेच बाळाच्या मृत्यूत देखील होऊ शकते. मातामृत्यू ही केवळ वैद्यकीय समस्या नसून अनेक सामाजिक घटकही मातामृत्यूला जबाबदार आहेत. आईचे वय 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान असताना मूल होणे श्रेयस्कर असते. 20 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आईचा बाळंतपणादरम्यान मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. अंतर जितके कमी असेल तितका माता मृत्यूचा धोका जास्त असतो. वरील तीन घटक एकमेकांशी संबंधित आहेत आणि आर्थिक परिस्थिती, सांस्कृतिक मानदंड, पोषण स्थिती आणि पर्यावरणीय घटकांशी संबंधित आहेत.
    सुरक्षित मातृत्व हा प्रत्येक मातेचा अधिकार आहे. मातांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेचा निकृष्ट दर्जा, निकृष्ट राहणीमान व समाजाचे खालावलेली आर्थिक सामाजिक स्थिती याचा दृश्य परिणाम म्हणजे  मातामृत्यू दर.

   वर सांगितलेली माता मृत्यूची कारणे प्रतिबंध करण्याजोगी आहेत. गरज आहे ती फक्त आपल्याकडे उपलब्ध असणारे ज्ञान व कौशल्य यांचा प्रभावी आणि परिणामकारक वापर करण्याची.
माता मृत्यू दर टाळण्यासाठी खालील उपाय करता येतील.
  1. गरोदर मातांची लवकरात लवकर रुग्णालयात नोंदणी करावी.
  2. प्रसुतीपूर्व किमान तीन वेळा डॉक्टरांना भेटणे.
  3. रक्तक्षय आवर उपचार करणे.
  4. प्रसुतीपश्चात संसर्ग व रक्तस्त्राव यांचा प्रतिबंध करणे.
  5. बाळंतपणातील गुंतागुंती टाळणे.
  6. गरोदर पणात हृदयरोग तसेच इतर रोग असल्यास त्यावर प्रभावी उपचार करणे.
  7. हिवताप विरोधी उपाययोजना व धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण करणे.
  8. प्रसूतीच्या वेळेस संपूर्ण स्वच्छता पाळणे गावागावातील प्रसुती करणाऱ्या बाया व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण करणे कुटुंब नियोजनाच्या विविध पद्धतींचा प्रसार करून वारंवार बाळंतपणे टाळणे जोखमीचे गरोदरपण असणाऱ्या महिलांना प्रसूतीसाठी रुग्णालयात पाठवणे
  9. प्रत्येक माता मृत्यूची नोंद ठेवून त्यामागची कारणे शोधणे.
   प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत शासनातर्फे मातामृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

  आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. ती आई होईपर्यंत मात्र तिचा जीव धोक्यात असतो. मातृत्व संपादन करताना मृत्यूला सामोरे जावे लागणे ही कोणत्याही प्रगत समाजासाठी लांच्छनास्पद आहे. व्यक्ती, कुटुंब, समुदाय आणि आरोग्य सेवा यांच्या एकत्रित प्रयत्नातून मातृत्व निश्चितच सुरक्षित करता येते.

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने