www.upkarmarathi.com

बाळासाहेब पंतप्रतिनिधी



   |  बाळासाहेब पंतप्रतिनिधी 
उर्फ
|  भवानराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी
  जन्म : 24 ऑक्टोबर 1868   मृत्यू: 14 एप्रिल 1951

       Balasaheb pant pratinidhi बाळासाहेब पंतप्रतिनिधी म्हणजेच भवानराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी हे प्रजाहितदक्ष संस्थानिक होते . चित्रकार ,कीर्तनकार आणि व्यायामाचे  पुरस्कर्ते होते.21 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. हे साहित्य संमेलन इंदूर याठिकाणी 1935 साली झाले .
| बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा परिचय व ग्रंथसंपदा
            बाळासाहेब पंतप्रतिनिधी महाराष्ट्रातील औंध संस्थांचे अधिपती होते. विद्या, कला ,सेवा आणि त्याग  या सर्व दृष्टीने एक आदर्श राजे  होते . याशिवाय संस्थांचा कारभार पूर्णपणे लोकांच्या ताब्यात देऊन स्वतःच्या  कर्तबगारी  आणि प्रजाजनानावरील  विश्वास त्यांनी प्रगट केला. हिंदुस्थानातील संस्थानिकांमध्ये त्यांचे हे सर्वस्वी लोकतंत्र करण्याचे उदाहरण अद्वितीयच आहे .आपल्या राज्यातील प्रत्येक खेड्यामध्ये अन्न ,वस्त्र, आवश्यक गरजांबाबत स्वयंपूर्णता असावी .अशी लोकशाही बाबत त्यांची व्यापक कल्पना होती.

बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे शिक्षण

      भगवानराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी यांचे प्राथमिक शिक्षण औंधला झाले.हायस्कूलमधील शिक्षण साताऱ्यात आणि कॉलेजमधील  शिक्षण डेक्कन कॉलेज पुणे येथे होऊन 1894 साली ते बी.ए. उत्तीर्ण झाले.
       पुढे त्यांनी एक वर्ष मुंबईला राहून कायद्याचा अभ्यास केला. त्यानंतर वडील श्रीनिवास पंतप्रतिनिधी यांचे चिफ सेक्रेटरी म्हणून ते काम बघू लागले. वडील कैलासवासी झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण संस्थान कर्जमुक्त केले. श्रीमंत परशुराम श्रीनिवास उर्फ दादासाहेब व पुढे श्रीमंत गोपाळकृष्ण परशुराम उर्फ नानासाहेब असे पिता-पुत्र प्रतिनिधी पदावर आले, पण कारभारी जेकब बापूजी यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप येऊन त्यांना धारवाड येथे राहण्याचा हुकूम झाला. व वारसदारांपैकी विशेष योग्यतेचे म्हणून त्यांना संस्थांनाची गादी देण्यात आली होती.  भगवानराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी यांचा अधिकार प्रदान समारंभ दिनांक 4 नोव्हेंबर 1901 रोजी झाला.
      तेव्हापासून त्यांची कारकीर्द अत्यंत यशस्वी झाली . दीर्घ काळ यशस्वी राज्य करणारे हिंदू धर्माचे अभिमानी आचार व चारित्र्यसंपन्न आणि सर्व सुधारणा आपल्या राज्यात आणून पोहोचविणारे असे त्यांच्या कारकीर्दीचे वर्णन करता येईल. लोक हिताचा सर्वप्रथम विचार करणारे एक  आदर्शवत राजा असे त्यांना म्हणता येईल.

       ते पूर्ण निर्व्यसनी होते कर्तव्यदक्ष, नियमित आणि कष्टाळू,ध्येयवादी होते. त्यांचे विचार सतत उत्साहवर्धक आणि स्फूर्तीदायक असत. संदेश कथनाची शक्ती नैसर्गिक रित्या त्यांच्यामध्ये होती. 
      पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात चाललेल्या महाभारत संशोधनाच्या कामास त्यांनी प्रारंभी एक लक्ष रुपयांची देणगी दिली व ते काम सुरू केले. त्याबरोबरच बनारस हिंदू विद्यापीठाला त्यांनी दहा हजाराची देणगी दिली होती.
        सामाजिक बाबतीत देखील ते उदार विचारसरणीचे होते.भोजनाच्या पंगतीत ते  भेद मानीत नसत. म्हणजेच वेगवेगळ्या जाती धर्मांना वेगवेगळ्या पद्धतीने जेवणाचा मान देणे हे त्यांना मान्य नव्हते. त्यांच्या घरात पोट जातीय तसेच पुनर्विवाहित  देखील विवाह झाले होते. त्यांना अस्पृश्यता मान्य नव्हती. त्यांच्या काळात त्यांनी शाळांमध्ये, मंदिरात,सभेमध्ये कारखान्यात तसेच खुद्द राजवाड्यात देखील अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट केली. त्यांच्या राणीसाहेब स्वतः अस्पृश्य सुवासिनींना हळदीकुंकू देत असत .तर राजेसाहेब स्वतः देखील अस्पृश्यांच्या पंगतीत जेवत असत.

 भगवानराव श्रीनिवास पंतप्रतिनिधी यांचे कलागुण 

      बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या चित्रकले संबंधी रा.ब. म. वि. धुरंदर असे म्हणतात की, "त्यांची चित्रे पौराणिक आणि ऐतिहासिक स्वरूपाची आहेत. ती लोकप्रिय आणि सर्वोत्कृष्ट चित्र आहेत .त्यांच्या कलेमध्ये कोणत्याही पद्धतीचे अनुकरण नाही. त्यांची स्वतःचीच विलक्षण पद्धती आहे .म्हणून त्यांच्या या कलेला औंध स्कूल म्हणणे बरे होईल." त्यांच्या चित्रांतील पेहराव व मागील सर्व देखावा पूर्णपणे महाराष्ट्रीय पद्धतीचे असतात . त्याकरता त्यांचा व्यासंग दांडगा होता असे म्हणावे लागेल.

बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे चित्र विषयक ग्रंथ.
  1. चित्र रामायण
  2.  अजिंठा (मराठीतील सचित्र)
  3. श्री शिवाजी अलबम (यामध्ये हळदणकर, सरदेसाई ,केतकर ,चाफळकर, रा.ब. धुरंदर व श्रीमंत पंत साहेब यांची चित्रे आहेत.)
  4. महाभारत
  5. भवानी सहस्त्रनाम हे काही प्रमुख ग्रंथ आहेत.

त्यांनी काढलेली खालील चित्रे देखील विशेष वाखाणण्यासारखे  आहेत .
  1. महाभारत ,
  2.  कृष्णचरित्र , 
  3. भीष्मप्रतिज्ञा , 
  4. मुरलीवादन,
    त्यांनी स्वतः सुमारे 500 पर्यंत चित्रे काढलेली आहेत .त्यांनी आपल्या चित्र संग्रहात दुसऱ्या नव्या शेकडो चित्रकारांचीचित्रे लक्षावधी रुपये खर्चून जमवली स्वतंत्र अद्ययावत इमारत बांधून हा कलानिधी त्यांनी सुरक्षित ठेवलेला आहे .
      बाळासाहेब पंतप्रतिनिधी हे उत्कृष्ट कीर्तनकार होते. त्यांची कीर्तने अत्यंत परिणामकारक ,बहारदार, ठसकेदार होत असत.  त्यांचे वक्तृत्व अत्यंत परिणामकारक होते . त्या काळी भारतातील राजे लोक व्यायामाचा दांडगा व्यासंग बाळगत. त्यामुळेच त्याकाळी राजे लोक आपल्या पदरी पहिलवान बाळगत असत. यातूनच स्फूर्ती घेऊन बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी पुरुषांप्रमाणेच स्त्रियांना देखील व्यायामाची आवड निर्माण करण्यासाठी मोठा प्रयत्न केला. स्त्री आणि पुरुष दोन्ही करू शकतील असा आपला प्राचीन भारतीय व्यायाम प्रकार म्हणजेच सूर्यनमस्कार याचा त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू केला. 
       पुरुष ज्या  पद्धतीने साष्टांग नमस्कार घालतात ,त्या पद्धतीने त्यांनी स्त्रियांना देखील साष्टांग नमस्कार घालायला लावला . सूर्यनमस्कार या पद्धतीला त्यांनी फार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले व सूर्यनमस्कार पद्धतीला त्यांनी सार्वत्रिक स्वरूप दिले.
     जोपर्यंत औद्योगिक प्रगती होणार नाही तोपर्यंत आपले शेतकरी कधीही सुखी होऊ शकत नाही अशी त्यांची पक्की खात्री होती . आपल्या राज्यामध्ये तयार होणारा कच्चामाल आपण उपयोगात आणून त्यापासून पक्का माल  आपणच तयार केला पाहिजे. आपल्या गरजा या स्वावलंबी असल्या पाहिजे त्या परावलंबी असून उपयोगाचे नाही. आपल्या लोकांना इथेच मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध झाले पाहिजे. मजुरी करण्यासाठी आपल्या लोकांनी बाहेर जाण्याचा प्रसंग अजिबात येऊ नये.यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू केले.
       किर्लोस्कर बंधू ,ओगले बंधू ,औंध सोप वर्क्स, म्हैसूरचा हस्त कागद कारखाना तसेच साखर कारखाना हे कारखाने त्यांच्या मदतीने आणि आश्रयाने उभारले गेले आहेत . ते स्वदेशीची खंदे पुरस्कर्ते होते. राजेसाहेब म्हणजेच बाळासाहेब पंतप्रतिनिधी व राणी साहेब आपल्याच राज्यात तयार झालेला जाडाभरडा  सुताचा हातमागावर विणलेला  कपडा वापरण्यावर अत्यंत जोर देत असत.
       आपली प्रजा सुखी असली तरच आपण सुखी राहू शकतो. असा त्यांचा विश्वास होता .त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना शेतकी बरोबर इतर जोडधंदे पुरवण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांनी विविध योजना देखील सुरू केल्या. भरपूर अन्न, वस्त्र ,जीवनावश्यक सुखसोई, त्यानंतर स्वावलंबी उद्योगधंदे, आणि साक्षरता प्रसार या सर्वांचा सुरेख संगम साधून बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले.
      बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी आपल्या औंध  संस्थानामध्ये प्रत्येक गावात शाळा काढली. संस्थानांमध्ये साक्षरतेचे प्रमाण शेकडा 20 पर्यंत नेले. त्यांच्या या विशेष व दूरदृष्मुटीमुळे आणि सर्व गोष्टीत लक्ष घालण्याच्या स्वभावामुळे मराठी साहित्य संमेलन इंदोर,  कीर्तन संमेलन वाई , सर्वपक्षीय पंचांग परिषद पुणे  ,व्यापारी परिषद बारामती,  चित्रकार परिषद ,  व्यायाम परिषद बडोदे  इत्यादींची अध्यक्षपदे  त्यांनी भूषवली. 
      वयाच्या बहात्तराव्या वर्षी औंध येथे त्यांचे निधन झाले.


     तुम्हाला बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या विषयीची ही माहिती कशी वाटली ? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला अजून कुणाची माहिती हवी असेल तर तेही सांगा . आमच्या परीने तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करू.  धन्यवाद .


तुम्हाला खालील माहितीही उपयोगी ठरेल .नक्की वाचा .

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने