1001marathiessay.blogspot.com 

      फुलाचे मनोगत मराठी निबंध
Fulache manogat marathi nibandh







        आज बर्‍याच दिवसांनी माझ्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच आमच्या गावातील धरणावर फिरायला जाण्याचा योग जुळून आला. मनात आनंद तर होताच. धरणावर पोहोचलो तेव्हा सगळीकडे छानसे हिरवेगार गवत पसरलेले होते .जणू सगळीकडे हिरवी शाल अंधारलेली होती असे वाटत होते. जरा गवतावर पहुडलो इतक्यात माझ्या कानात कोणीतरी मृदू आवाजात कुजबुजत असल्याचा भास मला झाला. मी आश्चर्याने बघू लागलो आणि माझ्या कानाजवळच असलेल्या फुलातून आवाज येतो आहे, असे मला वाटले.
          माझ्या मनातील शंका दूर करण्यासाठी ते फुलच माझ्याशी बोलू लागले. " अरे मित्रा , मी हे गवतफुलच  बोलत आहे."
        धरणाच्या या सुंदर परिसरामध्ये मी तुझे स्वागत करतो. मी या तृणातील गवतफुल आहे. माझे आयुष्य तरी आहे तरी किती? पण जेवढे आहे तेवढे मी माझ्या आणि इतरांच्या सुखासाठी जगतो.
         तुमच्या सारखी अनेक माणसे याठिकाणी फिरण्यासाठी येतात. काही या मऊ गवतावर शांतपणे पहुडतात . त्यांच्या अंगाखाली गवत आणि अनेक फुले  चुरगळली जातात. लहान लहान मुले गवतावर बेधुंद होऊन धावतात, खेळतात ,मजा करतात यामध्ये देखील अनेक फुले त्यांच्या पायाखाली स्वतःचं अस्तित्व गमावतात. स्वतःचं अस्तित्व जमताना एकच सुखद भावना मनामध्ये असते की आपण कोणाला तरी आनंद देऊ शकलो.
       माझा आकार फारच लहान आहे. तसेच इतर चांगल्या देखण्या फुलांसारखे माझे रूपही नाही.या गोष्टीचा थोडासाही माझ्या मनात न्यूनगंड नाही.माझे अस्तित्व लहान वाटत असले तरीदेखील माझ्यातील हिंमत मात्र अतुल्य आहे.
        एकदा एक मोठे वादळ आले. त्या वादळामध्ये आजूबाजूची अनेक मोठी झाडे कोलमडून पडली, पण मी मात्र माझा धीर सोडला नाही. वादळ मोठ्या गर्विष्ठ भावनेने सगळीकडे नासधूस करत होते. सर्व प्राणिमात्रांना भीती दाखवत पुढे पुढे जात होतं पण मी अजिबात घाबरत नव्हतो. वाऱ्याने मला माझ्या छोट्या अस्तित्वाबद्दल चिडवले. वारा माझे अस्तित्व नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत होता. मी वाऱ्याला ठणकावून सांगितले,
    अरे वादळा तुझ्या सामर्थ्याने जरी सर्व दिशा घाबरत असतील ,परंतु मी मात्र अजिबात घाबरणार नाही.वादळाने माझे अस्तित्व नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु शेवटी विजय मलाच मिळाला.
       असेच तुझ्या आयुष्यातही संकटांचे अनेक वादळे येतील मग तू अजिबात घाबरू नकोस. संकटांचा पूर्ण निकराने सामना करायचा. अजिबात हार मानायची नाही. जे होईल ते होऊन जाऊ दे या तयारीने आयुष्य जगायचे. मग बघ हे संपूर्ण जग तुझ्या कर्तुत्वाला सलाम करेल.
        मी त्या छोट्या गवतफुलाचे मनोगत अगदी मन लावून ऐकत होतो. तितक्यात आईने मला आवाज दिला. मी त्या छोट्याशा गवत फुलाचा निरोप घेतला. त्याची शिकवण मनात पक्की ठेवून आयुष्यात तसेच वागण्याचा निर्धार घेऊन मी आईकडे निघालो.
      जेवणाचा आनंद घेऊन आम्ही आमच्या घरी परत आलो परंतु फुलाचे आत्मकथन मात्र माझ्या सदैव लक्षात राहील.


................. समाप्त.................

       तुम्हाला निबंध कसा वाटला कमेंट करून सांगा.





1001marathiessay.blogspot.com

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने